async='async' crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6496105907091667'/> HOME CONSTRUCTION : August 2023

Tuesday, 1 August 2023

बदलती जीवनशैली आणि माझे घर

                                              बदलती जीवनशैली आणि माझे घर ...
          घरातील खोल्यांची रचना करताना बदलत्या जीवनशैलीचा विचार करणे खूप गरजेचे आहे. इतिहासाचा विचार केला तर त्या काळातील घरांची रचना आणि आत्ताच्या घरांची रचना यामध्ये बराच बदल दिसून येतो.
           इ. स. १९६० चा विचार करता घरांची रचना हि फारशी सुटसुटीत नव्हती. त्यावेळी घराच्या बांधकामासाठी प्रामुख्याने दगड, माती, चुना यांचा वापर होत असे.  याप्रकारच्या घरामध्ये खोल्यांचा आकार कमी पण भिंतींचा आकार मात्र मोठा असायचा. त्याचप्रमाणे छतही कौलारू प्रकारचे असायचे. घरात वावरताना बऱ्याच सोयीसुविधांचा अभाव असायचा. त्यावेळी तंत्रज्ञान जास्त विकसित नव्हते त्यामुळे मनुष्य फक्त नैसर्गिक गोष्टींवर उदा. सूर्यप्रकाश, वारा यांवर अवलंबून होता.
          जसजसा काळ बदलत जाईल तसे नवे तंत्रज्ञान विकसित होऊ लागले. हळूहळू लाकडांचा वापर करून माड्यांची घरेही होऊ लागली. छतासाठी स्टीलच्या पत्र्यांचा वापर होऊ लागला.  साधारणतः इ.स. २००० पासून R.C.C. इमारतींचे बांधकाम वाढू लागले आणि आत्ताच्या काळात R.C.C. इमारत हि काळाची गरज होऊन गेली.
          पूर्वीची घरे जी दगड, माती आणि चुना यांचा वापर करून बांधण्यात आलेल्या घरांना टेक्निकल भाषेत लोड बिअरिंग कन्स्ट्रक्शन  असे म्हटले जाते. या प्रकारच्या इमारतीमध्ये बीम, कॉलम, स्लॅब  यांची तरतूद नसायची. घराचा सगळा  भार हा भिंतींद्वारे वाहिला जात असे. यामुळे भिंती मोठ्या पण राहण्यासाठीची जागा मात्र कमी असायची. पण R.C.C इमारतीमध्ये बीम, कॉलम, स्लॅब  यांची तरतूद असल्यामुळे भिंतींचा आकार कमी झाला. त्यामुळे पाहिजे तशी व मजबूत इमारत बांधता येऊ लागली. लहान जागेत वापरण्यासाठी जागा     ( कार्पेट एरिया ) जास्त मिळू लागली.
   
                                     जीवनशैलीतील बदल... 
          आता  लोक R.C.C. इमारतींकडे कसे वळू लागले आणि जीवनशैलीत बदल कसे होत गेले ते पाहू...
 पूर्वीची जीवनशैली 
१)  वाहतुकीची सोय : पूर्वी वाहतुकीसाठी प्राण्यांचा वापर आधिक प्रमाणात होत असे. बैलगाडी, टांगा, गाढव,इ. प्राण्यांद्वारे दळणवळणाची प्रक्रिया होत असे. त्यामुळे वाहतूक ही संथ गतीने होत असे. हळूहळू यामध्ये बदल होत गेले. तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि सायकली, मोटारसायकल यांचे प्रमाण वाढू लागले. सध्या दोन चाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या भरपूर वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात १ दोन चाकी आणि १ चार चाकी वाहन उपलब्ध आहे. R.C.C. बांधकाम करताना पार्किंगची सोय करणेही सोपे झाले आहे.

२) बांधकामासाठी वापरले जाणारे मटेरियल : साधारणतः इतिहास लक्षात घेतला तर दगड, माती आणि चुना यांचा वापर बांधकामासाठी होत असे. घरांची रचना सुटसुटीत आणि हवी तशी करणे कठीण जात असे आणि मजबुतीही कमी असे. पण R.C.C. इमारतीमध्ये सिमेंट, वाळू, खडी आणि स्टील यांच्या वापरामुळे घराची रचना हवी तशी आणि आकर्षक करणे सोपे झाले. त्याचबरोबर भिंतींचा आकार कमी होऊन वापरण्यासाठी जास्त जागाही मिळू लागली.
जुनी घरे 

३) राहणीमानातील  बदल : पूर्वीच्या राहणीमानात आणि आत्ताच्या राहणीमानात बरीच तफावत दिसून येते. जर दिवसाच्या सुरुवातीपासून विचार केला तर पूर्वी सकाळी आंघोळीसाठी आणि प्रातः विधीसाठी बाथरूम आणि टॉयलेटची सोय ही घराबाहेर केली जात असे आणि पूर्ण कुटुंबामध्ये  बाथरूम  व टॉयलेट ही  कॉमन ठेवली जायची. आत्ताच्या बदललेल्या जीवनशैलीप्रमाणे R.C.C.  घर बांधताना आपण बाथरूम  व टॉयलेट हे घराच्या आतच बंधू लागलो. त्याचप्रमाणे बाथरूम  व टॉयलेट हे कॉमन बांधण्यापेक्षा प्रत्येक बेडरूम साठी अटॅचड टॉयलेट बांधने सोयीचे ठरू लागले आहे.
       

          त्याचप्रमाणे किचनचा विचार केला तर पूर्वी चुलींवर स्वयंपाक बनवला जात असे. पण हळूहळू गोबर गॅस, C.N.G . गॅस वापरात येऊ लागले आहेत. त्याच्याही पुढे जाऊन आता सोलर शेगडी आणि इलेक्ट्रिक शेगडी वापरात येऊ लागल्या आहेत. किचनसाठी किचन ट्रॉली आणि बऱ्याच नवीन संकल्पना रुजू होत आहेत. R.C.C. घर बांधताना किचनची बाब प्रामुख्याने विचारात घेतली जाते. त्याचप्रमाणे आंघोळीसाठी चूल, बंब आणि हिटरचा वापर कमी होऊन सोलर वॉटर हिटर जास्त वापरात येऊ लागले आहेत. त्यामुळे R.C.C. इमारत बांधताना सोलर वॉटर हिटरसाठीही सोय करून ठेवणे गरजेचे झाले आहे. त्याचप्रमाणे मनोरंजनाचा विचार केला तर पूर्वी T.V. ची व्यवस्था नसायची परंतु आता T.V.,प्रोजेक्टर सारखी अनेक मनोरंजनाची साधने विकसित झाल्यामुळे मनोरंजनासाठी एक वेगळी खोली असावी ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे  त्याचा लाभ घेऊ शकतील.
            अशा प्रकारे वरील काही मुद्द्यांचा विचार करता लोक प्रामुख्याने घराची इमारत R.C.C. करण्यासाठी सरसावत आहेत. या इमारतींचे मजबुतीसोबत आयुष्यही जास्त असते. ते साधारणतः १०० वर्षे असते. घरासाठी ५० ते ६० वर्षे आयुष्य गृहीत धरणे योग्य ठरेल.
सोलर वॉटर हीटर 
             या R.C.C.  घराच्या रचनेतही राहणीमानानुसार बदल होत आहेत. त्याचप्रमाणे लोक घराची अंतर्गत आणि बाह्य सजावटही आकर्षक असावी या दृष्टीने विचार करताहेत. जसे कि खिडक्यांची रचना, त्याचप्रमाणे घराचे छत यांची रचना अशा प्रकारे असावी कि त्यामुळे घरालाही शोभा येईल आणि जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टी जसे कि सूर्यप्रकाश आणि हवा यांचाही लाभ घेता येईल. सध्याच्या धावपळीच्या जगात थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवावा यासाठी घरातच गार्डन, बाल्कनीमध्ये लँडस्केप, व्यायामासाठी शांत जागा इ. यांचीही सोय होऊ लागली आहे.
             वरील मुद्द्यांना अनुसरून घराची रचना कशी असावी आणि खोल्यांचा आकार किती असावा हे पुढच्या लेखात स्पष्ट केले जाईल.

सारांश : 'बदलती जीवनशैली आणि माझे घर' या लेखात पूर्वीची राहणीमानाची पद्धत आणि  आत्ताच्या राहणीमानाचे बदल स्पष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे R.C.C. घर बांधत असताना नवीन सुविधांचा विचार कसा करावा हे या लेखात स्पष्ट केले आहे. या लेखात आत्तापर्यंतच्या ५० वर्षातील बदल आणि भविष्यातील ५० वर्षात  होणारे बदल यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे.

                                                                                                                                      निकिता
                                                                                                                            मो. न.  ९४२०५०४८०१
                                                                                                                         FOR- SQUARE FOOT




                                               



Important points of plan

               घराच्या प्लॅनसाठीचे महत्त्वाचे मुद्दे 


           ... घराचा आराखडा तयार करताना इंजिनीअर किंवा आर्किटेक्ट कोणते मुद्दे लक्षात घेतात ?... 
 घराचा आराखडा (प्लॅन) तयार करताना इंजिनीअर किंवा आर्किटेक्ट बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करतात.त्यातील काही महत्वाचे मुद्दे पाहू. त्यातील एक म्हणजे घरातील अंतर्गत रचना आणि दुसरी म्हणजे बाह्यरचना. या प्लॅनच्या रचनेसाठी ज्या मुद्द्यांचा विचार केला जातो त्यांना ' प्लॅनिंगसाठीची नियोजन तत्त्वे' म्हटले जाते. ही तत्त्वे बरीच विस्तारित आहेत. त्यातील काही ठळक व थोडकी तत्त्वे या लेखात  स्पष्ट केली आहेत. ही तत्त्वे कशा प्रकारे वापरली जातात आणि कोणत्या तत्त्वांना विशेष महत्व द्यावे ते या लेखात पाहू.


बाह्यरचनेसाठीची नियोजन तत्त्वे 
१) बाह्यरचनेसाठीची नियोजन तत्त्वे : घराच्या  इमारतीचा प्लॅन तयार करताना आत्तापर्यंत झालेले आजूबाजूच्या परिसरातील बदल त्याचप्रमाणे भविष्यात होणारे बदल गृहीत धरणे महत्त्वाचे आहे. यामुळे घरातील सदस्यांबरोबरच आजूबाजूच्या लोकांचेही राहणीमान सुखदायक, आरोग्यदायी आणि प्रसन्न राहते . यासाठी प्रथमतः प्लॉटच्या आजूबाजूचा परिसर आणि रस्ते यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. रस्त्याच्या बाजूला घराच्या इमारतीची मूळ चौकट ठेवली जाते. त्याचप्रमाणे हॉल आणि पोर्चसुद्धा रस्त्यालगत  असणे सोयीचे ठरते. पोर्चचा वापर हा पार्किंगसाठी किंवा तात्पुरत्या उठण्या बसण्यासाठी केला जातो.
          त्याचबरोबर भविष्यासाठीची तरतूद म्हणून रस्त्यालगतच्या बाजूस पूरक अशी जागा सोडून इमारतीच्या इतर तिन्ही बाजूना थोडी जागा मोकळी जागा म्हणून ठेवली जाते. रस्त्याकडेची बाजू जास्त महत्त्वाची असल्याने इतर तीन बाजूंपेक्षा या बाजूला जास्त जागा सोडली जाते. ही मोकळी जागा सोडण्याचा मूळ उद्देश्य घरात हवा खेळती राहावी त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा सहजपणे पुरवल्या जाव्यात असा असतो.
          जेव्हा मूळ बांधकामास सुरुवात करावयाची असते त्यावेळेस दरवाजा आणि खिडक्यांसाठीच्या चौकटीचा विचारही बाह्यरचनेसाठी केला जातो. जेणेकरून तिन्ही ऋतूंचा यामध्ये विचार करून घरात सूर्यप्रकाश आणि हवा योग्य प्रमाणात येण्यास मदत होईल. दरवाजा आणि खिडक्यांची चौकट  यांचाही बाह्यरचनेमध्ये प्रमुख वाटा  असतो. यासाठी यांचा विचार करताना बाह्यरचनाही आकर्षक दिसावी अशी त्यांची रचना करावी.
भारताचे भौगोलिक स्थान 
२) अंतर्गत रचनेसाठीची नियोजन तत्त्वे : घराच्या आराखड्यासाठीची अंतर्गत रचना करताना प्रामुख्याने        ' उत्तरायण ', ' दक्षिणायन ' आणि ' ऋतू ' यांचा विचार केला जातो. जेणेकरून हवा घरात खेळती राहावी आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाशही मिळावा याबरोबरच प्रस्तावित, खोल्यांचे एकत्रीकरण, घरात ये-जा करण्यासाठीचा पॅसेज, स्वच्छताविषयक सेवा, आरोग्य , आर्थिक बजेट इ. या सर्वांचा विचार केला जातो. आता अंतर्गत रचना करताना कोणते मुद्दे लक्षात घेतले जातात ते पाहू.


खिडक्यांच्या चौकटींची रचना 
  • चौकटींची रचना:  अंतर्गत रचनेचा विचार करताना  महत्वाच्या तिन्ही ऋतूंचा विचार करणे सोयीचे ठरते. त्यामुळे खिडक्या आणि दरवाज्यांची व्यवस्था अशा प्रकारे असावी जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा त्रास घरामध्ये उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा आणि  उन्हाळ्यात हवा खेळती राहावी. याबरोबरच बदलत्या जीवनशैलीप्रमाणे खिडक्या आणि दरवाज्यांच्या चौकटींच्या व्यवस्थेतही बदल होत असतो. पूर्वी खिडक्या ह्या
 मध्यभागी घेतल्या जात असत ज्यामुळे कोपऱ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी प्रमाणात येत असे. परंतु आता नव्या व्यवस्थेनुसार  आर्किटेक्ट खिडक्यांच्या चौकटी भिंतीच्या एका बाजूस ठेवण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. यामुळे खोलीत जास्तीतजास्त सूर्यप्रकाश येतो. त्यामुळे चौकटींची रचना करताना या मुद्द्यांचाही विचार केला जातो.
    घराचा आराखडा  
  • खोल्यांचे एकत्रीकरण: प्रत्येक खोलीचे घरामध्ये एक विशेष कार्य असते. त्यामुळे घराचा आराखडा तयार करतेवेळी त्या खोल्यांचे योग्य ठिकाण आणि त्यांचे कार्यानुसार एकत्रीकरण यांचा विचार करणेही महत्वाचे असते. घरातील खोल्या किचन, हॉल, बाथरूम, टॉयलेट आणि जीना यांचे त्यांच्या कार्याप्रमाणे एकत्रीकरण कसे करावे हे पाहु. घरातील सर्वात महत्वाची खोली म्हणजे किचन. किचन हे प्रामुख्याने पूर्व दिशेस असावे. ज्यामुळे सकाळी पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशातील UV किरणांमुळे जीव-जंतू नष्ट होतील आणि घरातील वातावरण आरोग्यदायी राहील. त्याचप्रमाणे बेडरूमचे ठिकाण हे पश्चिमेकडे असणे सोयीचे ठरते. सायंकाळच्या वेळी हवा हि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पश्चिमेकडील हवेमुळे घरात हवाही खेळती राहते. त्याचबरोबर बाथरूम आणि टॉयलेटची व्यवस्था अशा प्रकारे असावी कि ते सर्वाना कॉमन म्हणून वापरता येईल आणि प्रायव्हसीही राहील. जिन्याचा विचार करताना जिना हा शक्यतो मध्यभागी ठेवला जातो जेणेकरून सर्व खोल्यांमधून तिथे लगेच पोहोचता येईल. 
           या खोल्यांच्या रचनेतही काळानुसार आणि गरजेनुसार बदल होत आहेत. बदलत्या जीवनशैलीप्रमाणे हॉल कम डायनिंग किंवा किचन कम डायनिंग, स्टडी रूम्स,इ. गोष्टीही वाढत आहेत. त्याचप्रमाणे घरामध्ये गार्डन एरिया, व्यायामासाठीची जागा याही नवीन संकल्पना येऊ लागल्या आहेत. अशाप्रकारे घराचा आराखडा तयार करताना कुटुंबातील सदस्य, त्यांच्या गरजा,आजूबाजूचा परिसर या गोष्टी लक्षात  घेतल्या जातात. त्याचप्रमाणे घर बांधताना कॉन्ट्रॅक्ट द्यावे कि, घर स्वतःच बांधून घ्यावे याचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. या विषयाची माहिती पुढील लेखात स्पष्ट करू.

सारांश: या लेखात घराचा प्लॅन ठरवताना इंजिनीअर किंवा आर्किटेक्ट कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करतात हे स्पष्ट केले आहे. या लेखामध्ये त्यातील काही ठळक मुद्द्यांची ओळख व्हावी आणि त्यांचा अर्थही स्पष्ट व्हावा असा प्रयत्न केला आहे.
















बदलती जीवनशैली आणि माझे घर

                                               बदलती जीवनशैली आणि माझे घर ...           घरातील खोल्यांची रचना करताना बदलत्या जीवनशैलीचा व...